Monsoon 2023: कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस, पोलीस स्टेशनही गेलं पाण्याखाली
News Marathi Latest: कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, (Kalyan-Dombivli) अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि ग्रामीण भागात मागील काही तासांपासून पावसाचा (Rain) जोर प्रचंड वाढला आहे. गेला दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, गेल्या दोन तासांपासून कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (heavy rain kalyan dombivli low lying areas accumulated water flood manpada police station monsoon 2023)
कुठे-कुठे पाणी साचलं?
डोंबिवली स्टेशन परिसर, डोंबिवली एमआयडीसी, कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात रस्त्यावर आता बरंच पाणी साचलं आहे. तर कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात नागरिकांच्या घरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे आडिवली-ढोकली परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहेत.
हे ही वाचा>> Shiv Sena : ‘शिंदें’ना झटका, ‘ठाकरें’चा विजय! हायकोर्टामुळे कुलूप उघडलं!
दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेकडून नालेसफाईची काम हाती घेण्यात येतात. नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, आज दोन तास कोसळणाऱ्या पावसाने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केल्याचे दिसून आले. तसेच नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. मात्र योग्य नालेसफाई होत नसून त्याऐवजी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केले जात आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात शिरलं पावसाचे पाणी, कोठडीही भरली पाण्याने
पावसाने शहरात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते, तर नेहमीप्रमाणे यंदाही मानपाडा पोलीस ठाणे देखील पाण्याखाली गेले. मानपाडा पोलीस ठाण्यातच किमान दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातच पोलिसांना तेथे थांबावे लागले. तर आपले कर्तव्य बजावत पावसाच्या पाण्यात तेथील साहित्य भिजू नये यासाठी त्याची उठाठेव देखील पोलिसांना करावी लागली.
हे ही वाचा>> Cabinet Meeting: मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय, संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर
जोरदार पाऊस झाल्यावर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल नाला तुडूंब भरून वाहतो. नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आणि पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने पावसात नाल्याचे सर्व पाणी पोलीस ठाण्यात शिरते, अशा वेळी कामकाज करणे अवघड होते, तक्रारदारांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत पोलीस ठाण्यात यावे लागते, तसेच साचलेल्या पाण्यातूनच पोलिसांना बंदोबस्त, गस्तीवर तसेच बचावकार्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईसह कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?
ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा साठी ऑरेंज अलर्ट तर, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पाऊस उत्तरेकडे सरकल्याने मुंबई आणि आसपासच्या शहरांसह कोकण भागात मान्सून मुसळधार ते अति मुसळधार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठीही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.