For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Nana Shankarshet: मुंबई घडवणारे 'नाना', एका विनम्र समाजसुधारकाचे पुण्यस्मरण

10:19 PM Aug 01, 2023 IST | मुंबई तक
nana shankarshet  मुंबई घडवणारे  नाना   एका विनम्र समाजसुधारकाचे पुण्यस्मरण
फोटो सौजन्य: देवेंद्र फडणवीस फेसबुक पेज
Advertisement

चंद्रशेखर बुरांडे (आर्किटेक्ट), मुंबई: आद्य मुंबईच्या (Mumbai) राजकीय, सामाजिक, धार्मिक इत्यादि क्षेत्रात थोर व्यक्तींनी केलेल्या स्फूर्तिदायक कार्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्या व्यक्तीचे पुतळारूपी स्मारक उभारण्याची परंपरा आहे. स्मारके आपल्या जीवनातील भूतकाळ व भविष्यातील दुवा साधण्याचे तसेच पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करतात. ब्रिटिशकालीन बहुभाषिक मुंबईच्या जडणघडणीत अनेक व्यक्तींचे योगदान लाभले आहे. म्हणून मुंबई शहर इतर शहरांपेक्षा आगळेवेगळे आहे. गतकालीन मुंबई निर्मितीचे श्रेय तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर्स, आर्किटेक्टस व समाजाची बौद्धिक जडणघडण व त्यांच्या समस्येची पूर्तता करण्यासाठी झगडणार्‍या भारतीय समाजसुधारकांना जाते. प्रशासकीय अनुभव असलेल्या गव्हर्नर सर बार्टल फ्रियरने शहर आराखडे बनवून त्याची अंमलबजावणी केली. (nana shankarshet visionary social reformer who shaped the city of mumbai 31 July 2023 is the 158th death anniversary)

Advertisement Whatsapp share

आर्किटेक्ट फ्रेड्रिक स्टीव्हन्स, जॉर्ज विटेट, जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट, इत्यादिनी जगप्रसिद्ध सरकारी इमारती डिजाइन केल्या. मुंबईतील अनेक पंथ व धर्मातील धनिक उद्योजकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून सामाजिक कार्यासाठी लागणार्‍या उत्तमोत्तम इमारती उभारण्यात आल्या. ह्या कार्यात जमशेदजी जीजीभाय, प्रेमचंद रायचंद, जेहांगीर कावसजी, फ्रामजी कावसजी इत्यादी उद्योजकांचा समावेश होता. समाजबांधणीत द्रष्टे व ज्वलंत राष्ट्रप्रेम असलेल्या अनेक समाजधुरिणांनी पुढाकार घेतला. जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व मुंबईतील समाजसुधारकांचे कार्य व त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेतो तेव्हा प्रामुख्याने नाना शंकरशेट यांचे नाव पुढे येते.

Advertisement

यांच्या प्रभावळीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर, डॉ. भाई दाजी यांच्यासारखी जनतेच्या कल्याणसाठी झटणारी थोर मनाची अनेक बुद्धिवान महाराष्ट्रीय माणसे होती. परंतु विविध सामाजिक कार्यात एकाच व्यक्तीने पुढाकार घेणार्‍या व्यक्ती संख्येने फार कमी असतात. नाना शंकरशेट हे त्यापैकी एक होते. मुंबईतील उद्योजक व राज्यकर्त्यांशी नानांचे अत्यंत स्नेहपूर्ण व सलोख्याचे संबंध होते. जमशेदजी जीजीभाय आणि फ्रामजी कावसजी हे नानांपेक्षा वयाने मोठे होते तरी देखील त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. नानांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे स्नेही फ्रामजी कावसजी यांचे स्मारक उभारण्यामागे त्यांचा पुढाकार कसा होता हे जाणून घेवूया.

Advertisement सब्सक्राइब करा

फ्रामजी कावसजी हे आपल्या आयुष्यभर ज्या ध्येयसिद्धीसाठी झटले व झगडले त्याला सर्वस्वी पोषक होवून राहणारे असेच शैक्षणिक स्वरूपाचे स्मारक होते. फ्रामजी कावसजी यांचे 1851 मध्ये निधन झाले. त्यांचे स्मारक करण्यासंबंधीचा पहिला ठराव मांडण्याचा बहुमान नानांच्या वाट्यास आला व ती घटना अगदी स्वाभाविक होती. आझाद मैदानानजीक धोबीतलावावरील जागेत इमारतीचा पायाभरणीसमारंभ स्मारक समितीचे अध्यक्ष नाना शंकरशेट यांच्या हस्ते तारीख 22 फेब्रुवारी 1862 रोजी पार पडला. या प्रसंगी नानांनी केलेल्या भाषणाचा मथितार्थ थोडक्यास असा होता:

“सभ्य ग्रहस्थहो, आमचे मित्र शेट फ्रामजी कावसजी हे निधन पावल्यानंतर त्यांच्या स्मारकार्थ आपण जी इमारत बांधण्याचे ठरविले होते, त्याच्या पायाभरणीसमारंभानिमित्त आपण येथे जमलो आहोत. स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्याने हे कर्तव्य पार पाडण्याचे माझ्या वाट्यास आले असले तरी तो मान दुसर्‍या अधिक योग्य माणसाकडे जावू शकला असता; परंतु शेट फ्रामजी कावसजी यांच्याशी माझे जे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे हे कर्तव्य पार पाडीत असता मला एक प्रकारचे समाधान वाटत आहे.

Advertisement

या इमारतीत सभागृह, वाचनालय व रसायनशाळा यांचा समावेश होणार आहे. ही वास्तू साधी असली तरी ज्या उद्देशांनी ती बांधली जात आहे त्या उद्देशास पूरक होवून रहाणारी आहे. हा पायाभरणीसमारंभ फार उशीर होत आहे; परंतु ज्यांनी ही स्मारकाची कल्पना काढली त्यांचे सर्व उद्देश साध्य होतील अशी परिस्थिति घडवून आणावयाची होती; तसेच आजकाल मुंबईत सुयोग्य जागा संपादन करणे किती कठीण झाले आहे याची कल्पना आपणास असेलच, आम्ही जागा मिळवली तरीही मागाहून त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या व त्या मिटविपर्यंत एवढा कालावधि लोटावा लागला.”

नानांच्या भाषणातून फ्रामजी कावसजी यांच्याबद्दल असलेली सद्भावना व कृतज्ञता कळून येते. वरील मथितार्थ “ना. नाना शंकरशेट यांचे चरित्र काळ व कामगिरी” ह्या पुस्तकातील आहे.

सन 1865 मध्ये नानांचे निधन झाले. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. ह्या दरम्यानचा कालखंड देखील जवळपास 75 वर्षाचा आहे. सन 2023 हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. परंतु ह्या तिन्ही कालखंडातील समाजजीवन खूप वेगळे आहे. आद्य मुंबईचा सर्वांगीण विकास साधण्यात नानांचा खूप मोठा सहभाग होता हे अनेकांना माहित नाही. नानांनी मुंबईतील सर्व समाजासाठी दिलेले योगदान व त्यांना मिळालेला सन्मान विविध क्षेत्राशी निगडीत होता हे खालील दाखल्यातून दिसून येते. भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यात महत्वाचा वाटा असणार्‍या दहा संचालकांच्या अर्धंप्रतिमा मध्य रेल्वे कार्यालय इमारतीच्या दर्शनी भिंतीवर बसवल्या आहेत. त्यात नाना शंकरशेट व सर जमशेदजी जीजीभाय हे दोघे भारतीय आहेत.

“जस्टीस ऑफ पीस” हा सन्मान मिळालेले नाना शंकरशेट हे पहिले भारतीय होते. नानांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात केलेल्या सामाजिक कार्याचा आवाका मोठा होता. एशियाटिक सोसायटी इमारतीमधील पुतळारूपी स्मारक स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आले. विविध क्षेत्रामध्ये इतक्या कमी वयात त्यांच्या इतके समाजकार्य कोणत्याही समाजसुधारकाने केलेले आढळत नाही. त्यानंतर ग्रँटरोड येथील चौकाचे नामकरण अर्धपुतळा, दादर येथील नाना शंकरशेट उड्डाण पुल, पोस्टाचे तिकीट, तसेच मुंबई महापालिकेच्या सभागृहातील तसबीर इत्यादि लहान-मोठ्या स्वरुपातील स्मारकरूपी प्रतीके भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आहेत.

स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रशासनाने घेतलेली दखल मात्र अल्प स्वरुपात असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकास “ना. नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक” असे नाव देण्याची मागणी रास्त वाटते परंतु ती देखील अनेक वर्ष प्रलंबित आहे. लेखकाच्या मते, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकास नाव देण्यातील महत्वाचे मुद्दे खालील प्रकारे आहेत.

1. भारतात रेल्वे सुरू करण्याची कल्पना नाना आणि मंडळीची होती.
2. नानांचे सामाजिक कार्य कुलाबा-ते मुंबई सेंट्रल हेच होते.
3. वर्तमान “मुंबई सेंट्रल” नाव बदलल्याने कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतरातून नानांची सामाजिक “कार्य ओळख” केवळ मुंबईपूर्तीच मर्यादित न राहता ती देशभर पोहोचावी हा नामांतरामागचा विचार! मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांची नावे एक किंवा दोन शब्दात आहेत. आजवर झालेल्या नामांतरातून नाव बदलण्याचा मूळ हेतू साध्य झाला नाही हे मुंबईतील “लोकमान्य टिळक टर्मिनस” ऐवजी LTT तसेच “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” ऐवजी CSMT अशा विशोभित उच्चारातून दिसून येते. म्हणून, मुंबई सेंट्रलचे नाव कमीत कमी शब्दात असायला हवे! स्थानकाचे नामांतरण व नाना शंकरशेट स्मारकाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याची खंत आमदार श्री सुनील प्रभू ह्यांनी सदरहू विधानसभेत मांडल्याची माहिती प्रतिष्ठानचे सेक्रेटरी अॅड. श्री मनमोहन चोणकर ह्यांनी दिली.

तत्कालीन मुंबईतील राज्यकर्ते, उद्योजक तसेच समाजसुधारकांनी मुंबईतील व्यापार, उदद्योग, शिक्षण व समाजकार्य इत्यादि क्षेत्रात दूरगामी परिणाम घडवले आहेत. वर्तमानकाळात “स्मार्ट सिटी” योजनेखाली भारतात अनेक नवीन शहरे वसवण्यात आली. कोणतेही शहर सर्व दृष्टीकोणातून कार्यक्षम असणे हे जितके गरजेचे असते तितकेच त्या शहराची सामाजिक स्वास्थ्य देखील उत्तम असला हवे ह्यावर त्या शहराचा ‘दर्जा’ अवलंबून असतो. परंतु सद्यपरिस्थितीत उभारलेली तथाकथित “स्मार्ट शहरे” सामाजिकदृष्ट्या किती सक्षम ठरतील हे आजतरी सांगता येणार नाही.

नानांनी मुंबईकरीता दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ मुंबई, वडाळा येथे इमारतरूपी स्मारक उभारले जाणार आहे. हे कार्य ना. (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान पदाधिकार्‍यांनी हाती घेतले आहे. नियोजित स्मारक इमारत उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यात विलंब होतो आहे ही फार मोठी खंत आहे. नानांचा जन्म ज्या ज्ञातीत झाला ती सर्व मंडळी नानांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे म्हणून अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न करत आहेत. नानांनी दिलेला लढा व योगदान कुणा एका धर्मातील नागरिकांसाठी नव्हता.

तत्कालीन मुंबईतील समाजसुधारकांनी समाजऋण फेडण्याच्या निमित्ताने आपआपल्या क्षमतेप्रमाणे योगदान दिले हे त्यांनी उभारलेल्या निजी संस्थातून दिसून येते. नानांचे समवयस्क असलेल्या उद्योजकांच्या वंशजांनी देखील नैतिक जबाबदारी समजून या बाबतीत सर्वतोपरी मदत करायला हवी!
स्वातंत्र्यानंतर वर्तमान मुंबईचा विकास करून शेकडो विकासक गर्भश्रीमंत झाले आहेत. त्यापैकी एका विकासकाने जरी मनावर घेतले तरी हे स्मारक सहजपणे उभे राहू शकते. भविष्यातील मुंबईचा विकास योग्य प्रकारे व्हावा म्हणून त्यांनी अनेक धनिक उदद्योजकांना प्रोत्साहित केले.

स्वातंत्र्यपूर्व मुंबईत राज्यकर्ते, उदद्योजक व समाजसुधारक ह्यांची कार्यपद्धती निर्धारित होती. तत्कालीन विदेशी आर्किटेक्ट्स व राज्यकर्त्यांनी शहर निर्मितीचे कार्य चोखपणे केले. उद्योजकांच्या मनात आपण मिळवलेल्या संपत्तीत समाजाचा वाटा असतो ही भावना होती. म्हणून समाजोपयोगी कार्यासाठी ते सढळ हाताने मदत करत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात उदद्योजकात स्वेच्छा मदतीचे प्रमाण अधिक होते. स्वातंत्र्यानंतर हे समीकरण पुर्णपणे बदलले आहे. स्वतंत्र भारतात बहुतांश राज्यकर्तेच उद्योजक बनले आहेत!

निरपेक्ष समाजसेवी वृत्ती अंगी असलेल्या मूठभर लोकांना समाजकार्य करण्यासाठी राज्यकर्ते व धनिक उदद्योजकांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते हे वास्तव आहे. वर्तमान समाजकार्य, “व्यावसायिक सामाजिक जबाबदारी” (Corporate Social responsibility) पार पडण्याइतकेच मर्यादीत राहिले आहे. थोडक्यात, निरपेक्ष समाजकार्य करणार्‍यांसाठी हा प्रवास खडतर आहे. वास्तव काहीही असो निदान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून केंद्र/राज्य सरकारने आपले कर्तव्य समजून स्मारक इमारत पूर्ण करण्यास आर्थिक मदत द्यावी ही कळकळीची विनंती. 31 जुलै 2023 हा नानांचा 158 वा स्मृतिदिन! ह्या निमित्ताने ना. नाना शंकरशेट यांना कोटी कोटी अभिवादन!!

वरील लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. त्याच्याशी मुंबई Tak सहमत असेलच असे नाही.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज