Durga Bhosale Shinde: इंदिरा गांधींच्या बॉडीगार्डची कन्या ते युवा सेना सचिव, दुर्गाबद्दल हे माहितीये का?
आदित्य ठाकरेंच्या कोअर कमिटीची मेंबर असलेली युवा सेनेची सचिव दुर्गा भोसले शिंदे हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ ठाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात दुर्गा भोसले देखील सहभागी झाली होती. मोर्चात चालत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने दुर्गाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
दुर्गाच्या निधनाने युवासेनेमध्ये शोककळा पसरली आहे. आदित्य ठाकरेंनी बुधवारी रात्री उशीरा ट्विटरवरुन शोक व्यक्त केला. युवा सेनेची रणरागिणी असलेली दुर्गा भोसले शिंदे नेमकी कोण होती हेच समजावून घेऊयात…
रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा गुन्हा पोलिसांनी नोंदवून न घेतल्याने ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. दुर्गा देखील या मोर्चात सहभागी झाली होती. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर घोषणा देखील देण्यात आल्या.
युवा सेना सचिव दुर्गा भोसलेंची माहिती
दुर्गा भोसले शिंदे ठाकरे गटाची कट्टर कार्यकर्ती होती. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी दुर्गा ही देखील एक होती. तिच्यावर युवा सेना सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दुर्गा पेशाने वकील होती. आदित्य ठाकरेंच्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनच दुर्गा युवा सेनेमध्ये काम करत होती. सगळ्यांना घेऊन चालणारी, मनमिळावू असं तिचं व्यक्तिमत्व होतं. आदित्य ठाकरेंशी एकनिष्ठ असं देखील तिने तिच्या ट्विटरच्या बायोमध्ये उल्लेख केला आहे.
दुर्गाचे वडील होते इंदिरा गांधींचे सुरक्षा रक्षक
मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा गांधी यांचे बॉडिगार्ड असलेल्या केशवराव भोसले यांची दुर्गा ही कन्या होती. केशवरावांनी पुढे सक्रीय राजकारणात सहभाग घेतला होता. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू दुर्गाला घरातूनच मिळालं होते. दुर्गा शिवसेनेची युवती सेना आघाडी एक हाती सांभाळायची, ती युवा सेनेच्या कोअर कमिटीची सदस्य देखील होती. तिच्या कामामुळे तिने अनेक युवती आणि महिलांना शिवसेनेशी जोडलं होतं. अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना सामावून घेणारी, मदत करणारी अशी दुर्गाचा ओळख होती.
संबंधित बातमी >> युवा सेनेने आदित्य ठाकरेंची कट्टर समर्थक गमावली; दुर्गा भोसलेंचं निधन
शिवसेनेच्या सर्वच आंदोलनांमध्ये दुर्गा अग्रभागी असायची. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात देखील तिने सोशल मीडियावर शिंदे फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते. दुर्गा हिने शेवटच्या ट्विटमध्ये म्हंटलं होतं की, ‘गतिमान सरकार की सत्तेच्या धुंदीत सुसाट? ठाणे येथे युवासेनेची युवती पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना बेदम मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. एका युवतीला घोळक्याने जाऊन मारहाण करणे हेच नपुंसकत्वाचे लक्षण’ हे दुर्गाने केलेलं हे शेवटचं ट्विट ठरलं.