Shiv Sena : उद्धव ठाकरेंना म्हणाले 'लुटारू', उदय सामंतांचा व्यंगचित्रातून वार
Maratha Reservation Uday Samant Uddhav Thackeray : मराठा आरक्षण मुद्द्याने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. आरक्षण देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. यातच उद्धव ठाकरेंकडून शिंदे सरकारला लक्ष्य केलं जात आहे. ठाकरेंकडून होत असलेल्या टीकेला राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. एक व्यंगचित्र शेअर करत सामंतांनी ठाकरेंना लुटारू म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा वेळ वाढवून दिला आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं होतं. काही दिवसांपूर्वी सामना अग्रलेखातून मराठा आरक्षणावर भाष्य करण्यात आले होते, ज्यात उपोषण स्थगित झाले असले तरी पेच कायम असे म्हटले होते.
व्यंगचित्र अन् ठाकरेंवर टीका
दरम्यान उदय सामंत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात मराठा आरक्षणासंदर्भात हे व्यंगचित्र आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावताहेत, असं दाखवण्यात आलंय. तर उद्धव ठाकरे हीच होडी मागे ओढताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंकडून आरोप करून यात खोडा घातला जात आहे, असं यात दाखवण्यात आलं आहे.
हेही वाचा >> Maratha Reservation साठी काँग्रेस आमदाराने स्वतःवरच झाडलेली गोळी, 1980 ची घटना काय?
हे व्यंगचित्र शेअर करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण डागला आहे. सामंतांनी ठाकरेंना लुटारू असं म्हटलं आहे. या व्यंगचित्रासोबत काही भाष्य केलं आहे, ज्यात सामंत म्हणताहेत, "जवा किनाऱ्याला सुरळित लागतंय तारू, तवा त्याच्यामधी खोडा घालतोय लुटारू…", असा वार सामंतांनी केला आहे.

सुषमा अंधारेंनी दिलं प्रत्युत्तर
उदय सामंतांनी केलेल्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं. "जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, ईडी सीबीआयमुळे पळून जातात भेदरट. निष्ठा आणि इमानदारीचा अस्त होऊन गद्दारीचा होतो उदय, तवा विश्वासघातकी वहिवाट होते "डांबरट", असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >> Angelo Mathews Time Out : सौरभ गांगुली होणार होता ‘टाइम आऊट’, पण…
जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट;
ईडी सीबआय मुळे पळून जातात भेदरट
निष्ठा आणि इमानदारीचा अस्त होऊन
गद्दारीचा होतो उदय
तवा
विश्वासघातकी वहिवाट होते "डांबरट"@samant_uday@AUThackeray
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @OfficeofUT @rautsanjay61 https://t.co/ECD3xTH1gQ— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 6, 2023
काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्यावर डांबर घोटाळा केल्याचे आरोप झाले. याच आरोपांवर बोट ठेवत सुषमा अंधारेंनी उदय सामंताना उत्तर दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंसोबत चांगले संबंध असलेल्या उदय सामंतांकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची टीका झाली आहे.