World Cup 2023 Final: मैदानात घुसला, कोहलीला मारली मिठी; तो पॅलेस्टाईन समर्थक कोण?
Palestine Fans in World Cup 2023 Final: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरक्षा रक्षकांना चकमा देत एक पॅलेस्टाईन समर्थक मैदानात घुसला. या पॅलेस्टाईन समर्थकाने विराट कोहलीच्या जवळ जाऊन त्याला पकडले. त्यामुळे मैदानात मोठा गोंधळ उडाला.
कोहलीला भेटण्यासाठी तरुण घुसला स्टेडियममध्ये
त्या तरुणाने पॅलेस्टाईनचा ध्वज असलेला मास्कही घातला होता. भारताची फलंदाजी सुरू असताना डावाच्या 14व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर ही घटना घडली. या घटनेनंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी येऊन त्या पॅलेस्टाईन समर्थकाला पकडून बाहेर नेले. यावेळी तरुणाच्या हाताला दुखापत झाली. सध्या त्या तरुणाला पकडून गुजरातमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
हे ही वाचा >> मॅक्सवेलने कोहलीला मारला चेंडू, नंतर विराटने…; व्हिडिओ झाला व्हायरल
आता त्या तरुणाची संपूर्ण माहितीही समोर आली आहे. त्याचे नाव वेन जॉन्सन आहे. तो ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पासपोर्टवरूनही हे उघड झाले आहे. त्याचे वय अवघे 24 वर्षे आहे. सुरक्षा नियम तोडणारा तरुण म्हणाला, 'माझे नाव जॉन्सन आहे. मी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. विराट कोहलीला भेटण्यासाठी मी स्टेडियममध्ये प्रवेश केला होता. मी पॅलेस्टाईनचे समर्थन करतो."
आधी भारतीय संघाची जर्सी, नंतर...
सूत्रांनी सांगितले की, आरोपी वेन जॉन्सन हा अंतिम सामना पाहण्यासाठी भारतीय संघाची जर्सी घालून स्टेडियममध्ये दाखल झाला होता. म्हणजेच तो टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आला आहे, हे त्याला सांगायचे होते. मात्र, नंतर तो स्टँडमध्येच ही जर्सी बदलून पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारा टी-शर्ट घालून मैदानात उतरला. यावेळी त्याने कोहलीचा झेलही घेतला होता.
पाकिस्तानी खेळाडूंनीही गाझाला दिला होता पाठिंबा
या विश्वचषकापूर्वी हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले. पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने विश्वचषकाच्या मध्यावर या युद्धाचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला होता. श्रीलंकेविरुद्ध मॅच-विनिंग शतक झळकावल्यानंतर, त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि आपले शतक गाझाच्या लोकांना समर्पित केले होते.
हे ही वाचा >> भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा, हाता-तोंडाशी आलेलं विश्वविजेतेपद कांगारूंनी हिसकावलं!
यानंतर पाकिस्तान संघातील अनेक खेळाडूंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पॅलेस्टाईनचे समर्थन केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असताना दुसरी घटना घडली होती.
कोलकाता सामन्यात दिल्या गेल्या पॅलेस्टाईनच्या घोषणा
त्यानंतर या सामन्यादरम्यान एक प्रेक्षक स्टँडवर पोस्टर झळकावताना दिसला होता. त्याचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला. त्या दर्शकाने पोस्टरमध्ये लिहिले की, 'दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे.'
हे ही वाचा >> टॉस जिंकूनही का केली नाही प्रथम फलंदाजी? कमिन्सने सांगितलं कारण
त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. यावेळी 3 ते 4 मुले पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवताना दिसली. ते पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणाही देताना दिसले. या प्रकरणानंतर वाद चांगलाच वाढला होता.